आमच्याबद्दल
न्या. रानडे बालक मंदिर मध्ये आपले सहर्ष स्वागत
पाश्चात्य देशात किंडर गार्डन सारखे नवीन प्रयोग सुरू झाले होते प्रा. के.गो. पंडित हे नवीन मराठी शाळेचे शालाप्रमुख असताना त्यांनी ३ ते ५ वर्षाच्या मुलांकरता शाळेत वर्ग जून 1936 साली सुरू केला. त्यामध्ये मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीच्या साहित्यांचा उपयोग सुरू केला. लोकप्रियतेमुळे या वर्गाच्या प्रथम २ व नंतर ३ अशा तुकड्या कराव्या लागल्या.
न्या. महादेव गोविंद रानडे यांचे चिरंजीव डॉ. रानडे यांनी ३१ जानेवारी, १९५० रोजी सोसायटीला एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून नर्सरी स्कूलच्या जागे करिता व इमारती करिता खर्च करावेत अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर ही स्वतंत्र संस्था या देणगीतून उभी राहिली. १८ डिसेंबर १९८६ रोजी न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
न्या. रानडे बालक मंदिरात सुरुवातीपासून क्रीडन पद्धतीतून प्रशिक्षण दिले जाते परंतु बदलत्या काळानुसार पाटीवर गणित भाषेचे लेखन सुरू झाले.या व्यतिरिक्त विषयवार वर्ग मांडणी हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. खेळातून गणित भाषेचे वर्ग, जीवन व्यवहाराचा वर्ग, हस्तव्यवसाय, विज्ञान प्रयोग, इंद्रिय शिक्षण हे वर्ग सुरू झाले व उत्तरोत्तर शाळेच्या उपक्रमांमध्ये नवीन नवीन गोष्टींची भरच पडत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने १९९२ साली ५ वर्ग खोल्या बांधल्या. २००३ साली प्ले ग्रुप सुरू केला. सध्या शाळेमध्ये प्ले ग्रुपचे २ वर्ग, मिनी केजीचे २ वर्ग, छोट्या गटाचे ४ वर्ग व मोठ्या गटाचे ५ वर्ग आहेत.
१ जून २००६ साली प्रायोगिक तत्त्वावर डे केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. शाळेने लावलेल्या या रोपट्याला देखील छान बहर येऊ लागला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थांमधील शाळांची मुले आपल्या डे केअर सेंटर मध्ये प्रवेश घेऊ शकतात. कोरोना काळानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी व्यतिरिक्त इतर मुलांनाही (वयोगट २ ते १० वर्षे) डे केअर सेंटर मध्ये आपण प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. १ जून 1936 रोजी शाळा 90 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. सदैव प्रगती पथावर वाटचाल करणारी पुण्यातील एक अग्रगण्य मराठी माध्यमाची शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे.
उद्दिष्ट
आदर्श विद्यार्थी घडवणे.
उद्याचा जबाबदार, सुजाण आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडवणे.
ध्येय
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे.
हसत-खेळत आणि क्रिडन पद्धतीने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे.
मुलांच्या अंगी मूल्यशिक्षण सहजरीत्या बाणवणे.
विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रभक्ती रुजविणे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले सण उत्सव परंपरा यांचा मुलांना परिचय करून देणे.
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.