प्रवेश सुरु
श्रीमती अमिता दाते

श्रीमती अमिता दाते

मुख्याध्यापक

नमस्कार,   

न्या रानडे बालक मंदिर शाळेची स्थापना १ जून १९३६ रोजी झाली. ३ ते ५ या वयोगटातील मुलांच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवून बालमंदिराची स्थापना करण्यात आली. न्या.रानडे यांच्या नातवाने न्या. रानडे यांच्या नावाने देणगी दिल्यानंतर बालक मंदिर चे नाव न्या. रानडे बालक मंदिर असे ठेवण्यात आले. 

NEP अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने पूर्व प्राथमिक शाळेसाठी उद्घृत केलेले क्रीडन पद्धतीने शिक्षण ( activity based learning ) आपल्या शाळेत सुरुवाती पासून दिले जाते हे शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.गणित, भाषा, जीवन व्यवहार, हस्तव्यवसाय बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी खेळ, या प्रत्येकाचे स्वतंत्र वर्ग आहेत,  त्यात काही शिक्षकांनी केलेली व काही विकत घेतलेली भरपूर साधने आहेत. 

पूर्व प्राथमिक शिक्षण तत्वांनुसार मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीस पूरक अनेक उपक्रम शाळेत राबविण्यात येतात. 

५ वर्षापर्यंत मुलांच्या हाताच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास होत असतो हे लक्षात घेऊन शाळेत छोट्या गटापर्यंत लेखन घेत नाही.तर त्यांच्या सूक्ष्म स्नायूंच्या विकासासाठी पूरक व्यवसाय घेतले जातात. लिखाण मोठ्या गटात घेतले जाते.त्यातही मुलांचा पाया पक्का करण्यावर भर दिला जातो.म्हणूनच अ ते ज्ञ मुळाक्षरे व त्यांच्या वरचे शब्द,१ ते २० अंक एवढेच लेखन घेतले जाते. शाळेत मुले वही शिसपेन्सिल लिखाणासाठी वापरत नाहीत,(शिसपेन्सिल चे टोक निमुळते असते ते धरून लिहितांना मुलांच्या बोटावर अतिरिक्त ताण येतो ).या वयोगटातील मुलांना मुक्त हालचाली साठी मोकळीक आवश्यक असते. या दृष्टीने बेंच न वापरता सतरंजीचा वापर होतो. मुलांना खेळण्यासाठी मोठे ground व बाग आहे. 

अनुभवातून मूल जास्त चांगल्या प्रकारे शिकते या साठी मोठ्या गटातील मुलांना बिन भिंतीची शाळा   या उपक्रमांतर्गत विविध अनुभव दिले जातात. उदा.स्थळ भेटी.या स्पर्धेच्या जगात मुलं टिकून राहिली पाहिजेत,त्यांना अपयश व यश दोन्हीही चांगल्या पद्धतीने स्विकारता आले पाहिजे म्हणून शाळेत विविध स्पर्धा घेतल्या जातात. मुलांनी स्नेहसंमेलनात सूत्र संचालनासहित केलेले विविध गुणदर्शन , व क्रीडा दिन ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. घरासारखीच काळजी घेणारे,पालकांच्या सोईच्या दृष्टीने ताजा व चविष्ट खाऊ देणारे पाळणाघर हे ही एक शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य. 

ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी सुशिक्षित,उत्साही,कल्पक व मुख्य म्हणजे बालकांमध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या शिक्षिका, मुलांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या व त्यांच्या साठी पौष्टिक खाऊ करणाऱ्या मदतनीस शाळेच्या प्रगती साठी सातत्याने प्रयत्न करत असतात. शाळेच्या अजूनही कितीतरी महत्व पूर्ण बाबी सांगता येतील. त्या लिहिण्या पेक्षा प्रवेशोत्सूक पालकांनी शाळेस भेट दिल्यास त्यांना शाळा अनुभवता येईल. आणि शाळेला भेट देऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे आमच्या न्या रानडे बालक मंदिर येथे सदैव स्वागतच आहे.