प्रवेश सुरु

लहान मुलांना जन्म देणं हे जितकं आनंदाचं आणि महत्त्वाचं आहे तितकंच त्यांच्यासाठी योग्य अशी शाळा निवडणं हे ही महत्त्वाचं आणि आनंदाचं आहे.

राघव साठी शाळा निवडताना ही गोष्ट नक्की होती की त्याला मराठी माध्यमातून शिकवायचं , कारण मातृभाषेतून शिक्षण हे योग्य आणि मुलांच्या आकलना करता सहज सोपे असते याची जाणीव नक्कीच होती  आणि आयुर्वेदिक डॉक्टर आणि समुपदेशक या नात्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळताना  हे प्रकर्षाने जाणवलं होतं,त्यामुळे त्याबाबतीत दुमत नव्हतं पण शाळा कोणती निवडायची या प्रश्नावरून  मात्र गोंधळ उडाला.

पण थोडा शोध घेतला, नंतर लक्षात आलं की रानडे बालक मंदिर ही शाळा आपल्या मुलासाठी योग्य ठरू शकते. आणि आम्ही 2021 मध्ये छोट्या गटात प्रवेश घेतला. नेमका हा काळ कोविडचा होता त्यामुळे शाळेत जाऊन शिक्षण शक्य नव्हते, पण त्यातूनही मार्ग काढून शाळेने ऑनलाईन शाळा घेण्याचे ठरवले .आता हे मुलांना जमेल का असाही प्रश्न आला, पण शाळेतले शिक्षक इतक्या छान पद्धतीने मुलांना शिकवत होते की राघव साठी ते सहज साध्य झालं आणि आनंदाने तो रोज ऑनलाईन वर्गाची वाट बघू लागला! त्याला अभ्यासाची गोडी लागली, आणि फायनली जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा हा वर्गात बसेल की नाही ,रडेल का असे सगळे प्रश्न क्षणात संपले, कारण त्याला शाळा प्रचंड आवडली आणि खरंच शाळा आवडण्यासारखीच आहे. शाळेतल्या प्रत्येक ताई या बाई कमी आणि मुलांच्या आई जास्त आहेत. खूप लवकर शाळेने मुलांना लळा लावला, शाळेत कधी जातो असं राघवला व्हायचं. फक्त अभ्यासाच्या बाबतीत नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा प्रयत्नशील असते. मराठी शाळा जरी असली ,तरी संस्कृत आणि इंग्रजी या विषयांची तोंड ओळख  ही शाळेने करून दिली त्यामुळे या विषयांबद्दलची असणारी भीती निर्माणच झाली नाही.

मुलांसाठी स्नेहसंमेलन, क्रीडा दिन, वेगवेगळे सण, सणांची माहिती, शेकोटी कार्यक्रम,कथाकथन ,काव्यवाचन ,श्लोक पाठांतर स्पर्धा  हे सगळं शाळेत उत्साहाने साजरं होतं .प्रत्येक सणामागचा उद्देश  मुलांना सांगितला जातो, शिकवला जातो. पालखीचा  कार्यक्रम हा एक सोहळाच असतो. मुलांकडून व्यावहारिक कामं, जसं भाज्या निवडणं हे सुद्धा शाळेत करून घेतले जाते .शाळेत पाळणाघर सुद्धा आहे ,तिथे मावशी जे जेवण बनवतात ते फार चविष्ट आहे,त्यामुळे शाळा म्हणजे दुसरे घरंच वाटतं. जोवर मुलांना समजत नाही तोवर शिकवलं जातं. राघव त्याच्या ताईंशी छान गप्पा मारत बसायचा , जे जे घडलं ते सगळं सांगायचा. स्पर्धेची तयारी सुद्धा शाळेत अगदी छान पद्धतीने मुलांकडून करून घेतली जाते, त्यामुळे व्यक्तिमत्व विकास हा शाळेत घडला. राघव विविध स्पर्धांमध्ये जे यश मिळवतो त्याचा पाया रानडे बालक मंदिर ने घातला आहे.व्यासपीठावर जाण्याची हिंमत याच शाळेने राघवला दिली. आई जशी मुलांना मायेने, प्रेमाने घडवते, शिकवते तशीच मातृभाषा त्याच मायेने प्रेमाने मुलांना घडवते.म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी रानडे बालक मंदिर ही शाळा एक आदर्श शाळा आहे. शाळेत तुम्ही तुमचं मत अगदी मोकळेपणाने मांडू शकता ,बोलू शकता. अशी शाळा राघवला लाभणं खरोखरच आमच्यासाठी भाग्याचं आहे.शाळा, दाते बाई आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांचे आम्ही खूप ऋणी आहोत.

डॉ.सोनाली घाटणेकर
डॉ.सोनाली घाटणेकर

मुलांसाठी शाळा निवडताना मूल साधारण २-३ वर्षाचं झालं की प्रत्येक पालकाची शाळेबद्दलची thought process सुरु होते. तशीच आमची ही झाली.  

मी पहिल्यापासून मराठी भाषेत शिक्षणाच्या बाजूने आहे. पण अमेरिकेत असल्यामुळे इंग्लिश मेडीयम शिवाय पर्याय नव्हता. तिथे आम्ही  प्ले ग्रुपला त्याला प्रवेश घेतला. आजूबाजूची मंडळी सांगायची की मुलासोबत इंग्लिश मधेच बोला ( आणि ही सांगणारी मंडळी मराठी होती). पण तिथल्या शाळेत सांगण्यात आल की तुमच्या मातृभाषेमध्येच मुलाशी बोला. इंग्लिश ही फक्त एक भाषा आहे तो शाळेत येईल तेव्हा आपोआप त्याला ती यायला लागेल. अमेरिकेतून भारतात येताना, त्याचा शिक्षण मराठीतून व्हावं, हे एक प्रमुख कारण होतं. पण यायचं  तर पुण्यात शाळेत कुठे घालायचा हा प्रश्न होता. ओळखीच्या लोकांना विचारले तर थट्टा करण्यात आली ( अगदी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये का इथपर्यंत ). तेव्हा आपणच रिसर्च करावा असा ठरवलं. ३ प्रमुख मुद्दे होते. शाळा नावाजलेली असावी, शिक्षक चांगले असावे आणि मुलांच्या संपूर्ण विकासाला चालना मिळावी.  

वेग-वेगळ्या शाळांचे नंबर शोधणे, त्यांना फोन करणे, त्यांचे youtube वर व्हिडीओ बघणे, फेसबुक वर त्यांचे पेज शोधून त्यांचे उपक्रम बघणे हे उद्योग केले.  असे करता करता मला नवीन मराठी शाळेबद्दल कळालं. त्यांच्या विज्ञान कक्षाचा व्हिडीओ बघून तर मी फिक्स केला की इथेच शाळेत टाकायचा. मग जेव्हा शाळेत फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की बालवाडीसाठी  रानडे बालक मंदीर मध्ये फोन करा. मी माझ्या मित्राला तिकडे पाठवला आणि शाळेतुन व्हिडीओ कॉल करायला लावला. परिसर खूपच छान होता. बाईंबरोबर फोनवर बोलणं झाला. नंतर भारतात आल्यावर दाते बाईंना भेटलो, त्यांनी शाळेबद्दल आणि शाळेच्या उपक्रमांबद्दल छान माहिती दिली. शाळेतली बाग, झाडे, दगडी इमारत ह्यामुळे मुलगा जाम खुश होता. आम्हालाही आनंद झाला.   

तरीही बरेच जण आम्हाला तुम्ही खूप मोठी चूक करताय, त्याचा करिअर खराब करताय, त्याला इंग्लिश येणारच नाही असा सांगायचे. पण जेव्हा  ह्याच लोकांच्या मुलांशी आम्ही बोलायचो तेव्हा कळायचं की त्यांना इंग्लिश येत होता पण ज्ञान काहीच नव्हता आणि संस्कार तर कुठेच नव्हते . सहावीच्या मुलीला शिवाजी महाराज कोण हे माहित नव्हता. सिंहगड ची माहिती विचारली असता  सिंहगड ही पिकनिक हिल आहे असे उत्तर येत होते. दुकानांमधून दूध कसे घेऊन यायचे हे पण त्यांना कळत नव्हते. थॅंक्सगिविंग, हॅलोविन, आणि क्रिसमस ह्या सणांचं खूप कौतुक होत पण होळी, बैलपोळा, नागपंचमी, रंगपंचमी ह्या आपल्या सणांबद्दल काहीच माहिती नव्हती. भरमसाठ फी देऊन सुद्धा शिकवणी क्लासेस लावायला लागत होते. मुलांना एक वाक्य सुद्धा स्वतःच्या मनानेे लिहिता येत नव्हते. कित्येक मुलांच्या वागण्यात उर्मटपणा होता, वडीलधाऱ्या लोकांशी कसं वागावं बोलावं ह्याचे संस्कार नव्हते.शिवाय आई वडिलांच्या  स्टेटसचे प्रेशर मुलांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसत होते. हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला आमची निवड योग्य आहे ह्याची खात्री पटायची. 

रोज whatsapp वर वर्गात काय होतंय ह्याची माहिती मिळत होती शिवाय  दर महिन्याला बाईंना प्रत्यक्ष भेटून  मुलाची प्रगती सुद्धा कळत होती. शाळेतले उपक्रम आणि कार्यक्रम मुलाइतकेच आम्ही सुद्धा एन्जॉय करत होतो. मराठी शाळेत ऍडमिशन घेतले म्हणून चेष्टा करणारे लोक नंतर मुलाची प्रगती बघून कौतुक करायला लागले. अजूनही काही लोक थट्टा करतात पण माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद ,  त्याची शैक्षणिक प्रगती आणि त्याचा सामान्य ज्ञान हेच त्यावरच उत्तर असत. आणि ह्याचा संपूर्ण श्रेय रानडे बालक मंदीर आणि नवीन मराठी शाळेच्या सगळ्या स्टाफला जात. आता माझा मुलगा नवीन मराठी शाळेत आहे आणि मुलगी रानडे बालक मंदीर मध्ये. तेव्हा खोट्या प्रतिष्टेच्या नादी लागून आपल्या मुलाला इंग्लिश मिडीयमच्या फॅक्टरी मध्ये टाकू नका तर त्याला/तिला समाजात सुसंस्कृत माणूस म्हणून वावरण्यासाठी तयार करणाऱ्या शाळेत घाला. 

त.टी. - मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेलो आहे आणि गेली जवळपास १७ वर्षे आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. आजतागायत माझ्या मराठी माध्यमात शिकल्याचा माझ्या करिअर मध्ये मला कुठेही तोटा झालेला नाहीये आणि झालाच तर फायदाच झाला आहे.  

 

श्री. चेतन देसाई
श्री. चेतन देसाई

न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर हीच शाळा का ?.... 

        मराठी माध्यमामध्ये मुलांना शिकवणे हा आमचा निर्णय पक्का होता. चौकशी केल्यानंतर पाच ते सहा जणांनी रानडे बालक मंदिर ही शाळा खूप छान आहे असे सांगितले होते. माझा मुलगा आत्ता चौथीला आहे तो रानडे बालक मंदिर मध्ये होता. त्याच्या बाबतीत तर आम्हाला खूपच चांगला अनुभव आला होता. त्याच्यावेळेस नेमके कोरोना ने थैमान घातले होते. त्यावेळी शाळेने ऑनलाईन पद्धतीने रोज शाळा सुरू ठेवली होती. त्यामध्ये शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांकडून गाणी, गोष्टी,  क्राफ्ट, क्ले वर्क, असे अनेक उपक्रम ऑनलाइन पद्धतीने  करून घेतले. त्याचबरोबर मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी गाणी ,मुळाक्षरे, इंग्रजी, अक्षरे, शब्द  ऑनलाईन शिकवले. एवढ्या लहान वयाच्या मुलांकडून अभ्यास  करून घेणे खूप कठीण होते त्यासाठी मी रानडे बालक मंदिरच्या सर्व शिक्षकांची खूप आभारी आहे.

           सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण नवीन असल्यामुळे सुरुवातीला खूप कठीण गेले पण सर्व शिक्षकांनी संयम ठेवून मुलांकडून दीड वर्ष घरी बसून गरजेचा असलेला मूलभूत अभ्यास करून घेतला.           रानडे बालक मंदिर मध्ये माझी मुलगी रमा ही मोठ्या गटात शिकत आहे. तीन वर्षात  सर्वांगीण विकास शाळेमध्ये होत आहे. शाळेमध्ये सकाळी परिपाठापासून ते पसायदानापर्यंत मुलं  मनापासून सर्व गोष्टींचा आनंद घेत असतात. 

रोज शाळेमध्ये प्रार्थना, मनाचे श्लोक, स्तोत्र असे रोजचे पाठांतर घेतले जाते. त्याशिवाय छोट्या मुलांना  मराठी, हिंदी ,संस्कृत, इंग्रजी अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी शिकवतात. त्याशिवाय रोजच्या रोज अभ्यासही करून घेतात. शाळेत मुलांना खेळण्यासाठी बाग आहे त्याचप्रमाणे मोठे पटांगण आहे त्यामुळे मुलांची खेळातही प्रगती होते. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष घालून त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते.  हा या शाळेचा विशेष गुण आहे. रमा घरी आल्यावर शाळेत काय शिकवले हे रोज  सांगते. 

      आणखी एक शाळेचे वैशिष्ट्य सांगायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी शाळा प्रयत्नशील असते. वर्षभरात अशा खूप स्पर्धा शाळेत सुरू असतात.  त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. स्टेज डेरिंग येते.          दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन असते त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सामील करून घेतले जाते. त्यामुळे मुले खूप आनंदी असतात.  त्याशिवाय दरवर्षी एक दिवस मुलांची सहल आयोजित केली जाते. 

          बिन भिंतीची शाळा या उपक्रमांतर्गत  मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले जाते तेथे त्या ठिकाणाबद्दल माहिती सांगितली जाते असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये सतत राबवले जातात.        शाळेत मुलांची  जबाबदारी घेतली जातेच पण एखाद्या मुलाला काही झालं तर घरच्यांप्रमाणे त्यांची काळजी सुद्धा शाळा घेते याचा अनुभव मला दोनदा आला आहे त्यामुळे रानडे बालक मंदिर मध्ये जाणारे मुल हे तेथे आनंदाने वावरत असते याबद्दल तीळ मात्र शंका नाही. 

     थोडक्यात सांगायचे झाले तर लेखन ,वाचन, वक्तृत्व, शिस्त, निरीक्षण क्षमता, आकलन या सर्व स्तरावर मुलांचा सर्वांगीण विकास या शाळेमध्ये होतो. 

        पुण्यामध्ये मराठी माध्यमाची शाळा सांगायची झाली तर न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर ही एक अग्रेसर शाळा आहे, हे मी नक्की सांगेन .

 

सौ. मेधा आनंद जोग
सौ. मेधा आनंद जोग

"नमस्कार माझा या ज्ञानमंदीरा".... 

नावाप्रमाणेच न्या.रानडे बालक मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो.आईबाबांचा हात धरून चिमुकली पावलं ( रडत रडत) शाळेत प्रवेश करतात आणि बघता बघता केव्हा या शाळेत रमून जातात कळतही नाही.मला या शाळेतील सर्वांत जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे टिचर आणि मिस् च्या जमान्यात इथल्या शिक्षिकांना अजूनही 'ताई' म्हटले जाते.आईनंतर मुलांना सर्वांत जवळची असते ती ताई. त्यामुळेच या शाळेतील ताईंशी मुले आपसूकच जोडली जातात.इथल्या सर्व ताई मुलांशी व पालकांशी खूप आपुलकीने बोलतात आणि अगदी हसत - खेळत शिक्षण देतात.विशेष म्हणजे मुख्याध्यापिकांनाही ताईच म्हटले जाते. त्याही खूप प्रेमळ आहेत, शाळेतील प्रत्येक मूल त्यांना शाळेत असताना तर माहीत असतेच पण मुले मोठी झाली तरी त्यांच्या विशेष गुणांसह त्यांच्या लक्षात असतात.असाच मावशी वर्ग देखील मुलांची खूप काळजी घेतो.  

  शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अविरतपणे झटणारी शाळा!लेखन, वाचन, चित्रकला ,कथाकथन, खेळ या सर्वच विषयात आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रगती मुलांमध्ये दिसून येते.शिक्षिकांचा अनेक वर्षांचा अनुभव येथे दिसून येतो.श्लोक पाठांतर केल्याने मुलांचे उच्चार सुधारतात व बुद्धीही तल्लख होते.तसेच लहान वयात केलेले पाठांतर आयुष्यभर लक्षात राहते.याचा विचार करुन मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्षासारखी अवघड स्तोत्रे पूर्व प्राथमिक वयातच मुलांकडून पाठ करून घेतली जातात.स्नेहसंमेलन हा तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! इतकी चिमुकली मुले एवढ्या मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर मराठी,इंग्रजी व संस्कृत भाषेत निवेदन करत आहेत हे पाहून भारावल्यासारखे होते.इंग्रजी विषयातही आम्ही कमी नाही हे  'स्पोकन इंग्लिश 'द्वारे घेतलेल्या तयारीने दिसून येते ,तर ' बोली संस्कृत ' शिकून देववाणी संस्कृत मधील शब्द व गाणी मुले सहज म्हणतात. 'जीवन व्यवहार'द्वारे मुलांना स्वावलंबनाचे धडेही दिले जातात.शर्टची बटणे लावणे, भाजी निवडणे, पोळी लाटणे यांसारखी छोटी छोटी कामे मुलांना शिकवली जातात. एवढ्या छोट्या वयात असे ज्ञान देणारी मी ही एकमेव शाळा पाहिली.' बिनभिंतीची शाळा' या माध्यमातून आपल्या परिसराची ओळख करून दिली जाते व मुलांचे सामान्य ज्ञान वाढवले जाते. एकंदरीतच मुलांचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर न्या.रानडे बालक मंदिर ही सर्वोत्तम शाळा आहे. शिक्षणासोबतच सुसंस्कृत असणे जास्त गरजेचे आहे आणि त्याचे बीज इथे रुजवले जाते .मी 13 किलोमीटर अंतरावरून माझ्या मुलीला या शाळेत घेऊन येत होते आणि माझ्यासारखे केवळ या शाळेसाठी येणारे अनेक पालक होते व आजही आहेत,  ते केवळ या शाळेच्या गुणवत्तेमुळेच! मराठी शाळेत घालण्याचा आणि तेही रानडे बालक मंदिर मध्ये प्रवेश घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. माझ्या मुलीची एकंदरीत प्रगती पाहून मी नक्कीच सुखावते. अजूनही खूप लिहिण्यासारखे आहे परंतु शब्द मर्यादा!या शाळेची उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल होवो हीच सदिच्छा! 

डाॅ.सौ.सौम्या कुलकर्णी
डाॅ.सौ.सौम्या कुलकर्णी

आपली मुले मोठी झाली की प्रत्येक पालकांना प्रश्न पडतो की मुलांना कोणत्या शाळेत घालायचे कोणत्या माध्यमातून शिकवायचे? असा प्रश्न माझ्या पण मनात आला...विचार केल्यावर एक नक्की झाले की मुलांना मराठी माध्यामातूनच शिकवायचे कारण मुलांचा शिक्षणाचा पाया पक्का झालाच पाहिजे...  

आता मराठी शाळा म्हटल्यावर डोळ्यासमोर नाव आले पुण्यातील न्याय.रानडे बालक मंदिर, शनिवार पेठ...शाळेतील विविध उपक्रम...बिना भिंतीची शाळा...शाळेत होणार्‍या निरनिराळ्या स्पर्धा...मुलांकडे  वैयक्तिक लक्ष...शिक्षकांचे मार्गदर्शन...त्यामुळे घडते मुलांचे उज्ज्वल भविष्य....शाळेत होणारे हे उपक्रम मी पहात होते... तसेच माझी बहीण, भाऊ, बहिणीची मुल हे सगळे या शाळेचे विद्यार्थी,शाळेतील नवीन उपक्रम, स्नेहसंमेलन, हे सगळे बहिणीच्या,मैत्रिणीच्या स्टेटसला बघायचे....तेव्हाच ठरवले की आपल्या मुलांना पण आपण ह्याच शाळेत घालायचे.. 

आज माझी मोठी मुलगी पहिलीला तर मुलगा छोट्या गटात आहे.. दोन्ही मुलांची अभ्यासातील, खेळातील, शाळेतील प्रगती, तसेच शिक्षण विवेकच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची आवड याचे पूर्ण श्रेय मी शाळेला अणि सर्व ताईंना देते...शाळेचे अणि सर्व शिक्षिकांचे मनःपूर्वक आभार... 

सौ पूजा ओमकार कुंटे
सौ पूजा ओमकार कुंटे